BelgaumRound.in

News, Jobs, Business, and more

येळ्ळूर येथे बंद घर फोडून 5 लाखांची चोरी, परिसरात भीतीचे वातावरण

बेळगावच्या अवचारहट्टी (ता. बेळगाव, येळ्ळूर) येथे चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून तब्बल 5 लाखांहून अधिक किंमतीच्या ऐवजावर डल्ला मारला. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चोरी कशी घडली?
परशराम हुवाप्पा तुळजाई (रा. मारुती गल्ली, अवचारहट्टी) हे सोमवारी आपल्या कुटुंबासह हंगरगा येथे यात्रेसाठी गेले होते. यावेळी घराला कुलूप होते. चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत रात्रीच्या सुमारास मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले आणि घरात प्रवेश केला.

चोरट्यांनी कपाट उघडून त्यामधील –

  • 2 तोळ्यांचे मंगळसूत्र
  • 1.25 तोळ्याचा नेकलेस
  • 0.5 तोळ्याची सोनसाखळी
  • 1 तोळ्याच्या कानातील रिंग्स आणि कर्णफुले
  • 5 तोळ्याचे चांदीचे दागिने
  • ₹25,000 रोख रक्कम

… असा मौल्यवान ऐवज लंपास केला आणि पळ काढला.

बेंटेक्स दागिने आणि इतर महागडे सामानही चोरीला
विशेष म्हणजे, चोरट्यांनी कपाटातील बेंटेक्सचे (नकली) दागिनेही खऱ्या समजून नेले. त्याचसोबत प्लंबिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या तीन मशीन आणि महागड्या साड्याही चोरीला गेल्या आहेत.

गावात चोरीच्या घटनांमध्ये वाढ, पोलिसांकडून कडक कारवाईची मागणी
तुळजाई कुटुंबीय मंगळवारी सकाळी घरी परतल्यावर त्यांना चोरीची घटना समजली. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

गेल्या काही दिवसांपासून येळ्ळूर, धामणे आणि परिसरातील गावांमध्ये वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत. मात्र, पोलिसांनी अद्याप ठोस पावले उचलली नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. रात्रीची गस्त वाढवावी आणि चोरट्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

पोलिसांनी लवकरात लवकर या चोरीचा तपास लावून आरोपींना अटक करावी, अशी अपेक्षा तुळजाई कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *