बेळगाव शहर परिसरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे आणि जाळण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. विशेषतः येळ्ळूर रोडवरील के.एल.ई. हॉस्पिटलजवळ मोठ्या प्रमाणात टाकण्यात आलेल्या कचऱ्याला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने परिसरात दुर्गंधीयुक्त धूर पसरला. यामुळे स्थानिक रहिवासी आणि शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या भागात मोठ्या प्रमाणात प्रवासी आणि स्थानिक लोक ये-जा करतात, ज्यामुळे येथे नेहमीच कचऱ्याचा साठा वाढत आहे. रस्त्याच्या कडेला साचलेल्या कचऱ्यामुळे व दुर्गंधीमुळे नागरिकांना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागतो. यामध्ये भटक्या कुत्र्यांचे वाढलेले प्रमाणही नागरिकांच्या समस्येत भर घालते.
आज सकाळी कोणा अज्ञाताने कचऱ्याच्या ढिगाला आग लावल्याने प्रचंड धूर निर्माण झाला. या धुरामुळे दुचाकी चालक, पादचारी, शेतकरी आणि स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. “हीच का स्मार्ट सिटी?” असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
महापालिकेकडून घराघरात जाऊन कचरा वेचणाऱ्या महिला नागरिकांना कचरा डब्बा घराबाहेर ठेवण्यास सांगत आहेत. तसेच, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आणि नागरिकांचे फोटो घेऊन, घरगुती कचरा महापालिकेच्या गाडीतच देण्याचे आवाहन केले जात आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळण्यास सक्त मनाईही केली जाते.
तथापि, येळ्ळूर रोडच्या कडेला सर्रासपणे कचरा टाकणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्तांनी तत्काळ लक्ष घालावे, तसेच परिसरात CCTV कॅमेरे बसवून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.










Leave a Reply