फेब्रुवारी महिन्यापासून अन्नभाग्य योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र व्यक्तीस दरमहा १० किलो तांदूळ वाटप सुरू झाले आहे. याआधी तांदळाचा तुटवडा असल्याने राज्य सरकारने प्रत्येकी फक्त ५ किलो तांदूळ वाटून उरलेले ५ किलो पैसे स्वरूपात थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले होते. मात्र, केंद्र सरकारने सवलतीच्या दराने तांदूळ पुरवण्यास सहमती दिल्यानंतर मार्चपासून प्रत्येक पात्र व्यक्तीस १० किलो तांदूळ देण्यात येत आहे. त्यामुळे पाच सदस्यांच्या कुटुंबाला तब्बल ५० किलो तांदूळ मिळतोय.
सामान्यतः १५ ते २० किलो तांदूळ एका कुटुंबासाठी पुरेसा असतो. त्यामुळे उरलेला तांदूळ अनेक ठिकाणी विकला जात असून, तो काळ्या बाजारातील व्यापाऱ्यांसाठी कमाईचं साधन बनला आहे. हे व्यापारी, हा तांदूळ लाभार्थ्यांकडून १५ ते २० रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करून, तोच तांदूळ पुढे जास्त भावाने विकतात.
मार्च महिन्यातच कलबुर्गी, गडग, चामराजनगर, बेल्लारी, हुबळी, उडुपी, बेळगाव यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये हजारो क्विंटल बेकायदेशीर तांदूळ जप्त करण्यात आला आहे. सर्व तांदूळ अनधिकृतरीत्या गोळा करून त्याची वाहतूक केली जात होती.
सीमा भागातील जिल्ह्यांमधून हा तांदूळ शेजारच्या राज्यांमध्ये तस्करी केल्याची माहितीही समोर आली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, बायोमेट्रिक प्रणालीमुळे आता रास्त दराच्या दुकानातून किंवा शासकीय गोदामातून तांदूळ चोरी किंवा बेकायदेशीर वाहतूक करणे जवळपास अशक्य झाले आहे. मात्र लाभार्थ्यांच्या घरून थेट खरेदी केल्यामुळे तस्करांना पकडणे कठीण ठरत आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागाने ‘आवश्यक वस्तू कायदा १९५५’ अंतर्गत हजारो प्रकरणांमध्ये गुन्हे नोंदवले आहेत. मात्र गुन्हेगारांवर अद्याप कडक कारवाई झालेली नाही. अश्या प्रकारे तांदूळ विकणाऱ्यांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार असून, खरेदी करणाऱ्यांवरही गुन्हा दाखल केला जाणार आहे.










Leave a Reply