BelgaumRound.in

News, Jobs, Business, and more

उचगाव, बसुर्ते, बेकिनकेरे या परिसरात हत्तीचा धुमाकूळ

elephant stampede

Elephant Stampede in Uchgaon Bekinkere Area :

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा परिसरातील चाळोबा जंगलातून महिनाभरापूर्वी बेळगाव तालुक्याच्या सीमेला आलेला हत्ती आता अधिक आक्रमक झाला आहे. गेल्या काही दिवसांत या हत्तीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले असून, नुकत्याच झालेल्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

शुक्रवारी (दि. 16) मध्यरात्री सुमारे दीडच्या सुमारास या हत्तीने एका घराशेजारी उभ्या असलेल्या कारवर हल्ला केला. पायांनी चिरडून आणि सुळे वापरून कारचे अक्षरशः चुराडा करण्यात आला. सदर कार पूर्णपणे स्क्रॅप झाली आहे. यापूर्वीही काही दुचाकींचे नुकसान या हत्तीने केले आहे.

त्यानंतर हत्तीने घराशेजारील आणि शेतातील पाण्याच्या ५,००० लिटर आणि १,००० लिटर क्षमतेच्या टाक्याही तब्बल ३० ते ४० फूट दूर नेऊन फोडून टाकल्या. शेतीमध्ये पाणी देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाईप्स आणि विद्युतपंपाचंही मोठं नुकसान झालं आहे.

गेल्या २०-२५ दिवसांपासून हा हत्ती कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती डोंगराळ भागात वावरत आहे. वन विभागाने या हत्तीला सुंडी गावाच्या हद्दीपर्यंत हुसकावून लावलं होतं. मात्र, स्थानिक नागरिकांनी पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून हत्तीला पुन्हा जंगलात परत पाठवलं. त्यामुळे हत्तीने बेकिनकेरे, उचगाव आणि बसुर्ते परिसरात पुन्हा प्रवेश करून शुक्रवारी रात्री मोठं नुकसान केलं.

नागरिकांची मागणी: तातडीने उपाययोजना व्हाव्यात

या घटनांनंतर स्थानिक नागरिकांनी वन विभागाकडे हत्तीच्या वाढत्या आक्रमकतेवर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने कारवाईची मागणी केली आहे. हत्तीच्या उपस्थितीमुळे शेतकरी, महिला आणि लहान मुलं देखील भयभीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *