बेळगांव फोर्ट रोडवरील नाल्यावर काही व्यक्तींनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून दुकाने उभारली आहेत. या अतिक्रमणांमुळे नाल्याची नियमित सफाई करण्यात अडथळे निर्माण होत असून, त्यामुळे पावसाळ्यात सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. बुधवार रोजी पार पडलेल्या महापालिकेच्या बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत या मुद्द्यावर गंभीर चर्चा झाली. संबंधित दुकाने कोणाच्या परवानगीने उभारण्यात आली आहेत, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. यासोबतच, नाल्यावर अतिक्रमण करून उभारण्यात आलेली ही बेकायदेशीर दुकाने तातडीने हटविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
बैठकीत फोर्ट रोडवरील नाल्याच्या अतिक्रमणाची सविस्तर माहिती विरोधी पक्षनेते यांनी निदर्शनास आणून दिले की, या दुकानदारांना हेस्कॉमकडून वीज कनेक्शनही प्रदान करण्यात आले असून, त्यामुळे या अतिक्रमणास कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी देण्यात आली आहे का? अशी शंका उपस्थित होते.
पूर्वी महापालिकेचे अधिकारी अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईसाठी जेव्हा संबंधित ठिकाणी जात असत, तेव्हा कोणत्याही प्रतिकाराशिवाय ती कारवाई पार पडत असे. तथापि, सध्याच्या घडीला महापालिकेच्या अधिकार्यांचा दबदबा आणि वचक कमी झाल्याचे दिसून येत असून, अतिक्रमणकर्ते महापालिकेच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. “आम्ही दुकाने काढणार नाही, कोणीही येऊ दे” असे उद्धट प्रत्युत्तर अतिक्रमण कर्त्यांकडून दिले जात आहे.
या बेकायदेशीर दुकानांमुळे नाल्यात मोठ्या प्रमाणावर कचरा साचत असून, त्यामुळे सांडपाण्याच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. परिणामी, पावसाचे पाणी मुख्य रस्त्यावर साचून घरांमध्ये शिरत आहे, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर फोर्ट रोडवरील नाल्यावर उभारण्यात आलेली सर्व बेकायदेशीर दुकाने तातडीने हटवावीत, अशी जोरदार मागणी बैठकीत करण्यात आली.










Leave a Reply