BelgaumRound.in

News, Jobs, Business, and more

चैत्र उत्सव – श्री ज्योतिबा यात्रेची भव्यता – १२ एप्रिल २०२५

shri jyotiba yatra

उद्या दि.  १२ एप्रिल २०२५ पासून दक्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या चैत्री यात्रेस परंभ होत आहे.

“चैत्रातली गुलालाची पर्वणी म्हणजे श्री ज्योतिबाची यात्रा.”

“परंपरेचा सन्मान आणि भक्तीचा आविष्कार – श्री ज्योतिबा यात्रेचा खरा अर्थ!”

 

चैत्र पौर्णिमा आणि श्री ज्योतिबा यात्रा कधी होते?

प्रत्येक वर्षी चैत्र पौर्णिमेला (एप्रिल महिन्यात) श्री ज्योतिबा डोंगरावर एक भव्य उत्सव साजरा होतो. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून सुमारे सहा ते सात लाख भाविक या पर्वासाठी येथे उपस्थित राहतात. सर्वत्र ‘चं ग बळा’ च्या गजराने परिसर दुमदुमतो आणि भाविक स्वतःला भक्तिरसात चिंब भिजवून घेतात.

यात्रा दरम्यान होणाऱ्या प्रमुख धार्मिक विधी

या दिवशी संपूर्ण परिसर गुलालाने लालबुंद होतो. नारळ, बंदीच्या नाण्यांचा आणि पालखीचा सोहळा हे दृश्य अत्यंत मनमोहक असते. श्रींचा राजकीय महाभिषेक पहाटे ५ ते ६ वाजता संपन्न होतो आणि त्यानंतर महापूजा सकाळी ७ ते ८ वाजता पार पडते. १० ते १२ दरम्यान धुपारती व पंचारती होते.

सासण काठी आणि मिरवणूक – यात्रा विशेष

सकाळी विधी पूर्ण झाल्यानंतर दुपारी १ वाजता मिरवणुकीची सुरुवात होते. या वेळी सासण काठ्या हलगी, पिपाणी आणि शहनाईच्या सुरावर नृत्य करतात. ही सासण काठी म्हणजे ३० ते ७० फूट उंच बांबू, ज्यावर टोकाला जाज्वल्य झेंडे आणि केसांचा गुच्छ असतो. श्री ज्योतिबांचे वाहन घोडा काठ्यांच्या पायथ्याला प्रतिष्ठित केलेले असते.

या यात्रेसाठी एकूण १०६ सासण काठ्या मान्य असून त्या एक दिवस आधी डोंगरावर पोहोचतात. यासोबत उंट, घोडे, तोफांचे रथ, भालदार, चोपदार यांची लवाजमासह मिरवणूक यात्रेचे आकर्षण वाढवते.

देवी यमाई व जामदग्नी विवाह – एक अनोखा सोहळा

सायंकाळी सुमारे ५ वाजता, श्री ज्योतिबांची उत्सव मूर्ती पालखीत बसवून यमाई मंदिराकडे प्रस्थान करते. देवी यमाई या श्री ज्योतिबांच्या बहीण असल्याने या दिवशी देवी यमाई आणि जामदग्नी यांचा विवाहसोहळा पार पडतो. श्री ज्योतिबा आपल्या पालखीमधून यमाईसाठी भेटवस्तू घेऊन जातात आणि विधी पूर्ण झाल्यावर परत येतात.

रात्री विविध धार्मिक विधींसह आकर्षक फटाक्यांचा कार्यक्रम साजरा केला जातो. चैत्र पौर्णिमेचा हा उत्सव एक महिन्यापर्यंत सुरु असतो आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत भावनांचा महापूर उसळतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *